रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

नामस्मरणाचा मार्ग

ग्रंथराज दासबोधातील नवविधा भक्तीनामक चतुर्थ दशकात समर्थ रामदासांनी विविध भक्तीमार्गांचे वर्णन केले आहे, महती सांगितलेली आहे. पण यातील तिसर्‍या समासातील जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. हा भक्तीमार्ग सर्व मार्गांपेक्षा वेगळा, सोपा आणि शीघ्र फलदायी असा आहे. 
नवविधा भक्तींमध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना,वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहेत. परंतु यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत. दुसर्‍यावर अवलंबून असे आहेत. त्यासाठी कसली तरी सज्जता असली पाहीजे. कसली तरी तयारी असावी लागते. वस्तु, व्यक्ती, काळ वेळ यावर या सर्व अवलंबून आहेत. परंतु नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळेच हा बंधमुक्त असा भक्ती प्रकार आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केवळ नामस्मरण या भक्तीचा प्रसार करूनच हा मार्ग किती सोपा आहे हे दाखवून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करण्याची शिकवण दिली आणि समर्थांचा हा भक्तीमार्ग या शतकात सर्वत्र पोहोचवला.
श्रवण भक्तीमध्ये श्रवण करण्यासाठी कोणती तरी कथन करणारी शक्ती पाहिजे, वक्ता पाहिजे, कथाकार पाहिजे, कीर्तनकार पाहिजे. नुसती श्रवण करण्याची इच्छा असून चालत नाही तर त्याची सिद्धता, तयारी पाहिजे. इथे परावलंबित्व आले. दुसर्‍यावर आधारीत ही भक्ती झाली. पण नामस्मरणाचे तसे नाही. फक्त इच्छा व्यक्त केली की लगेच नामस्मरण सुरू करता येते. त्यासाठी दुसरे कोणी असण्याची गरज नाही. त्यामुळे हा अत्यंत सोपा आणि चांगला मार्ग आहे.
कीर्तन भक्ती करायची म्हटली तर त्यासाठी विशिष्ठ प्रकारचा पोषाख आला, आसन आले. कुठेही जावून कीर्तन करता येत नाही. त्यासाठी विशिष्ठ अशी जागा असली पाहिजे. ही सगळी सिद्धता असली तरच कीर्तन करता येते. कीर्तनकाराचा पोषाख असला तरच ते करता येईल. जीन्स टी शर्ट घालून, फॉर्मल कपडे घालून कीर्तन केले तर त्याला अर्थ राहणार नाही. साथीला पेटीवाला पाहिजे, तबलजी पाहिजे, हाताट चिपळ्या पाहिजे, टाळ पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समोर श्रोता पाहिजे. इतके सगळे असले तरच कीर्तन भक्ती करता येणार. नामस्मरणाचे तसे नाही. कसलीही तयारी नको. कसलीही सिद्धता नको. कसलाही पोषाख नको. कोणी समोर असण्याची गरज नाही. कसल्या साथीची गरज नाही. इच्छा झाली की नामस्मरण भक्तीला सुरूवात करता येते. त्यामुळे अतिशय साधी सोपी आणि सहज साध्य असा हा भक्तीमार्ग आहे. नामस्मरण भक्तीसाठी कसल्याही वेळेचे, काळाचे, स्थानाचे बंधन नाही. ज्याप्रमाणे आपल्याबरोबर आपला श्वासोच्छवास असतो त्याप्रमाणे नामस्मरण करता येते. प्रत्येक क्षणी आपण नामस्मरण करू शकतो. जेवताना, खाताना, पिताना, झोपताना, चालताना काहीही बंधन न पाळता आपण नामस्मरण करू शकतो.
भक्तीमार्गातील चौथा मार्ग म्हणजे पादसेवन भक्ती. ही पादसेवन भक्ती करण्यासाठी सदगुरूचे, परमेश्वराचे पाय समोर असले पाहिजेत. पण नामस्मरणासाठी असे कोणतेही बंधन नाही. समोर मूर्ती नको, पादुका नको काही नको. फक्त आमच्या अंतरगातील राम आमच्या मुखातून त्याच्या नामाचे स्मरण करून घेतो असा भक्तीभाव महत्वाचा. समर्थांनी आपल्या श्लोकांमध्येही म्हटले आहे. मुखी ग्रास घेता म्हणावे श्रीराम. म्हणजे जेवताना, खातानाही आपण नामस्मरण करू शकतो. अखंडित चिंतीत जावे अशी ही नामस्मरण भक्ती असते. अन्य कोणत्याही भक्ती प्रकारापेक्षा नामस्मरण भक्ती ही त्यामुळेच सर्वांना भावते. यावर एक भक्तीसंप्रदाय निर्माण करण्याची ताकद आहे हे गोंदवलेकर महाराजांनी दाखवून दिले.
पाचवा भक्तीप्रकार हा अर्चन भक्ती आहे. म्हणजे देवतांची शास्त्रोक्त पूजा करायची. शास्त्रोक्त म्हणजे अगदी षोडशोपचार नाही निदान पंचोपचारी पूजा करायची ठरवले तरी सिद्धता आली. तयारी आली. अगदी अभ्यंगस्नान नाही निदान शूर्चीर्भूत होण्यापुरते स्नान करणे आवश्यक आहे. अगदी कडक सोवळे नाही निदान धूतवस्त्र तरी नेसणे आवश्यक आहे. पूजेची सर्व तयारी पाहिजे, फुलं, पाहिजेत, गंध, हळदी कुंकु, अक्षदा, अत्तर, उदबत्ती, निरंजन, समई पाहिजे, कापूर पाहिजे, नैवेद्य पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे समोर देवाची मूर्ती, प्रतिमा असे काहीतरी पाहिजे. यातील काहीजरी नसेल तरी तो भक्तीप्रकार करता येणार नाही. परंतु नामस्मरणाचे तसे नाही. कसल्याही तयारीशिवाय आपण नामस्मरण करू शकतो. आजारपणात आंघोळ केलेली नसेल तर तशा अवस्थेतही आपण नामस्मरण करू शकतो. कसल्याही सोवळ्या ओवळ्याची गरज नामस्मरणाला नाही.
सहावी भक्ती समर्थांनी वर्णन केलेली आहे ती म्हणजे वंदन भक्ती. देवाला, संतांना, सज्जनांना वंदन करून आपली भक्ती करायची. पण इथेही मूर्ती, व्यक्ती, काया, सगुण रूप याची गरज आहे. पण नामस्मरण ही भक्ती म्हणजे निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे स्मरण करून आत्मारामाला आळवता येते. आपल्या मनात, अंतरंगात असलेल्या परमेश्वराचे नामस्मरण करायचे आहे. इथेेच नामस्मरण भक्तीचे श्रेष्ठत्व दिसून येते. भक्तींच्या मार्गात श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च दुय्यम असा भेदभाव करता येत नाही, पण सर्वांना बरोबर घेवून जाणारा आणि सर्वांना साध्य होईल असा भक्तीमार्ग म्हणजे नामस्मरणाचा. कारण हा स्वावलंबी म्हणजे फक्त निर्धार आणि निश्चयावर, इच्छेवर
 अवलंबून असा मार्ग आहे.
समर्थांनी सांगितलेला सातवा भक्तीमार्ग हा दास्य भक्तीचा आहे. पण तो मार्ग पूर्ण करण्यासाठी देखिल कोणीतरी आपले दास्यत्व स्विकारण्याची गरज आहे. ते नाहीच स्वीकारले तर हा मार्ग अपूर्ण आहे. अशा कसल्याही बंधनांच्या पलिकडे असलेला भक्तीमार्ग म्हणजे नामस्मरण भक्ती.
याशिवाय सख्य भक्ती हा एक भक्तीचा प्रक़ार आहे. महाभारतात अर्जून आणि कृष्णाची, सुदामा कृष्ण यांची भक्ती ही सख्य भक्ती. पण भगवंताशी मैत्री करण्याइतपत पोहोचणे तितकेसे सोपे नसते. कारण समोर तसा भगवंतासम सखा भेटला पाहिजे. म्हणजे इथेही परावलंबित्व आले. त्यापेक्षा नामस्मरणाची ताकद सोपी आणि मोठी आहे.
आत्मनिवेदन हा आणखी एक प्रकार समर्थांनी सांगितला आहे. आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना, प्रार्थना या देवाला सांगायच्या. त्याचे निवेदन करायचे. परंतु यामध्ये सतत परमेश्वराशी, देवाशी संवाद करण्यासाठी समोर साक्षात आपला तो राम आहे अशी भावना तयार होणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ताकद येण्यासाठी नामस्मरण ही पायरी फार महत्वाची आहे.
कसल्याही तयारीशिवाय, सिद्धतेशिवाय आणि परावलंबित्व नसलेली नामस्मरण हा भक्तीमार्ग खूपच मोठा आहे. वेळ, काळ, स्थळ, वेश, ठिकाण या सगळ्याच्या पलिकडे जावून फक्त श्रद्धा या तत्वावर आधारीत हा भक्तीमार्ग आहे.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
x