रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

नारायण राणे यांनी स्वाभीमान जपला

  • गेले चार महिने नारायण राणे भाजपच्या वाटेवर आहेत अशा बातम्या येत होत्या. नारायण राणे यांना भाजपत विरोध आहे, शिवसेना विरोध करते आहे अशा चर्चांनी उगाचच काही काळ घालवला गेला. पण यावर रामबाण उपाय शोधत स्वतंत्र पक्ष स्थापन करुन नारायण राणे यांनी केवळ कोकणी बाणाच जपला आहे असे नाही तर महाराष्ट्राचा स्वाभीमान जपलेला आहे.
  • भारतीय जनता पक्षात येण्यापेक्षा त्यांच्या सोबत जात, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून आपण चांगले कार्य करू शकतो हा जो विचार नारायण राणे यांनी केला आहे, तो अत्यंत धूर्त, चलाख आणि नेमक्या राजकारणी अभ्यासकाचा निर्णय आहे. यातून नारायण राणे यांची दूरदृष्टीही दिसून आली आहे. सगळे एक्के आपल्या हातात ठेवण्याची संधी त्यांनी यातून साधली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळे वळण, कलाटणी देणारा असा हा निर्णय आहे.
  • साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशी म्हण आहे. त्याप्रमाणे भाजपला सतत डसणारी शिवसेना आणि भाजपमध्ये जावून काँग्रेसप्रमाणे फसवणूक होवू नये अशा विचाराने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही केलेली खेळी अत्यंत मुत्सद्दीपणाची अशीच आहे. त्यामुळे या संघटनेचा, पक्षाचा ते चांगला उपयोग करुन घेवू शकतात. प्रबळ पक्ष, संघटना म्हणून त्यांच्या पक्षाला यश येईल यात शंकाच नाही. याचे कारण आज भाजप सोडून अन्य पक्षातील अनेक नेते, खासदार, आमदार यांना त्यांच्या पक्षातील एकाधिकारशाही, डावलले जाणे यामुळे ते पक्ष सोडायचे आहेत. परंतु भाजपात जायचे नाही. अशा नेत्यांना ही चांगली सोय झालेली आहे. आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते त्यांच्या पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत. ते काही तरी नव्या संधीच्या शोधात आहेत. त्यांना नारायण राणे यांच्या पक्षामुळे चांगली संधी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नारायण राणे हे जर भाजपात गेले असते तर त्यांच्यामागे उभे राहणार्‍यांपेक्षा या स्वतंत्र पक्षाच्या घोषणेने त्यांच्याकडे येणार्‍यांची संख्या वाढेल. नारायण राणे याची ताकद वाढेल यात काहीच शंका नाही. आज कोणताही पर्याय समोर नसल्यामुळे आहे त्याच पक्षात बसून राहण्याशिवाय पर्याय नसलेल्या नेत्यांना नारायण राणे यांच्यामुळे नवी संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या अभूतपूर्व खेळीने नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे काम केले आहे.
  •     भाजपात जावून काँग्रेस पक्षाप्रमाणेच दुय्यम स्थान मिळवण्यापेक्षा स्वतंत्र पक्ष काढून राजे होणे त्यांनी पसंत केले आहे. पाहिजे तेंव्हा भाजपशी सलगी करुन सत्तेची फळंही चाखता येतील आणि विरोधक असलेल्या सेना, काँग्रेसला ठोकताही येईल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने नारायण राणे यांचा पक्ष पत्थ्यावर पडणार आहे. साहजीकच नारायण राणे यांना भाजप, अमित शहा, मोदी हे सगळे मांंडीला मांडी लावून बसवून घेतील. प्रत्यक्ष भाजपात जावून लांबच्या खुर्चीवर बसण्यापेक्षा मित्र पक्ष म्हणून थेट शेजारची खुर्ची मिळवणे हा अभ्यासू राजकारण्याचा विचार आहे. नारायण राणे यांनी ते करून दाखवले आहे.
  •    आज भाजपचा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधात राहून मित्र आहे तर शिवसेना ही सत्तेत राहून विरोधक आहे. काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यामुळे शिवसेनेलाच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका करावी लागत आहे. त्यामुळे भाजपला या सेनेला जे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशाप्रकारे सांभाळावे लागते आहे. साहजीकच शिवसेनेला उत्तर देण्याचे काम भाजपकडून चोखपणे होत नाही. त्यामुळे ही जबाबदारी मित्र पक्ष म्हणून नारायण राणे भाजपसाठी करतील आणि सेनेला घाईला आणतील. साहजीकच नारायण राणे यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या घोषणेने शिवसेनेच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही स्वबळावर निवडून येतो, आमच्यावर जनतेचा विश्वास आहे, बापजाद्यांचे पक्ष वारसा हक्काने चालवत नाही तर नवे स्थापन करू शकतो हे दाखवून महाराष्ट्रात आम्ही आहोत हे दाखवण्यात नारायण राणे यशस्वी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभीमान जपला आहे.
  1. x