दासबोधातील नवविधा भक्तीनाम चतुर्थ दशकातील समास क्रमांक 1 व समास क्रमांक 2 वर आधारीत हा विषय आहे. समास क्रमांक 1 हा श्रवणभक्तीचे ज्ञान देणारा आहे तर समास क्रमांक 2 हा कीर्तनभक्तीची जाण देणारा आहे. या दोन्ही भक्ती एकमेकांवर आधारीत अशाच आहेत. कारण श्रवण करण्यासाठी कोणी तरी सांगणारे असले पाहिजे. ज्यांचे श्रवण करावे असे कोणीतरी ज्ञानी, मार्गदर्शक असले पाहिजे. त्यामुळे श्रवण करण्याची इच्छा असली तरी श्रवणीय असे काही नसेल तर नुसती इच्छा असून काही उपयोग नाही. इथे नकळत परावलंबीत्व आहे. परंतु हे परावलंबीत्व त्या रघुनंदनाची महती सांगणार्यावर असल्यामुळे असे अवलंबून असणेही भाग्याचे मानावे लागेल.कीर्तन भक्ती करायची म्हटले तरी कोणीतरी श्रोता पाहिजे. श्रोताच नसेल तर त्या कीर्तनाला अर्थ तो काय राहणार? म्हणूनच कीर्तन आणि श्रवण या भक्ती एकमेकांवर अवलंबून आहेत. एकमेकांवर आधारीत आहेत. एकेमेकांचा हात हातात घालून जाणार्या आहेत. परस्परांना बरोबर घेवून जाणार्या आहेत. किंबहुना श्रोता आणि वक्ता यांच्यातील नाते हे गुरू शिष्या इतकेच महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या श्रोत्यांना श्रवण भक्ती करायची आहे त्यांच्यासाठी कीर्तन करणारा महत्वाचा आहे. तद्वतच ज्यांना कीर्तन भक्ती करायची आहे त्यांना श्रोताही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे या दोन्ही भक्तीचे प्रकार हे एकमेकांवर आधारीत आहेत असे याठिकाणी म्हटले आहे. नवविधा भक्तीतील हे दोन्ही मार्ग म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याचे आणि ज्ञानाची महती सांगण्याचे प्रकार आहेत. ते एकमेकांवर आधारीत आहेत. एकमेकांना बरोबर घेवून जाणारे आहेत. भ़क्ती मार्गात विविध कथा, व्रत, स्थान यांची महती ऐकून ती व्रते, दर्शन घेण्याची प्रेरणा मिळते. हे सर्व ज्ञान आपल्याला श्रवण केल्याने होत असते. परंतु त्यासाठी कोणीतरी चांगला वक्ता, ज्ञाता, दाता असा कीर्तनकार असावा लागतो. या सर्व ज्ञानाची महती ही कीर्तनातून दिली जात असते. कीर्तन ही ज्ञानप्रसाराची, भक्तीमार्ग प्रसाराची फार मोठी माध्यमशक्ती आहे. म्हणून तर नामसंकीर्तन करण्यासाठी साक्षात नारदांनी या भक्तीमार्गाचा अवलंब केला होता. श्रीविष्णूंचे नामस्मरण, कीर्तन करीत या भक्तीचा प्रसार करण्यासाठी साक्षात नारदांनी कीर्तन भक्तीचा प्रसार केला. कीर्तनकार म्हणजे नारदाची गादी असते. या गादीवरून तिन्ही जगात जे काय घडत आहे याची महती दिली जाते. यामध्ये हरिकथा पुराणांची माहिती दिली जाते. अध्यात्मिक निरूपण केले जाते. विविध कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योगमार्ग, वैराग्यमार्ग, विविध व्रते, विविध तीर्थस्थानांचे महात्म्य, विविध दानांचे महात्म्य सांगितले जाते. विविध प्रकारच्या मंत्रांची, तपांची माहिती सांगितली जाते. अशी माहिती सांगण्याचे साधन म्हणजे कीर्तन असते. परंतु हे केलेले कीर्तन, कथन हे कोणीतरी श्रवण करणे गरजेचे असते. श्रोता असेल तर कथनाला अर्थ आहे. नुसतो श्रोता उपयोगाचा नाही. नुसता वक्ता उपयोगाचा नाही. दोघे एकमेकांपाशी असतील तरच ती भक्ती पूर्ण होणार आहे. या दोन्ही भक्तींमध्ये परस्वाधीनता आहे. अर्थात हे स्वाधीन रामाला केलेले आहे. परमेश्वराला केलेले आहे. आपण परमेश्वरावर गुरुवर अवलंबून आहोत ही भावना त्याठिकाणी असते. परंतु या दोन्ही भक्ती या एकमेकांवर आधारीत आहेत.समर्थांनी श्रवणभक्ती नामक समासात म्हटले आहे, श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं।अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥ या श्लोकाचे विवेचन करून पुढील सर्व समासांमधून विविध प्रकारच्या भक्तीमार्गांची महती सांगितली आहे. यातील श्रवणं कीर्तनं या दोन्हीचा उहापोह येथे केला आहे. कीर्ती, स्तुती स्तवने भजने। नानाविध ऐकावी असे पहिल्या समासात सांगीतले आहे. तर दुसर्या समासात कीर्तन भक्तीचे महात्म सांगताना म्हणतात, प्रसंगे हरिकथा करावी। सगुणी सगुणकीर्ती धरावी। निर्गुणप्रसंगे वाढवावी अध्यात्मभक्ती॥ अशा या परस्पर आधारीत उपदेशातून समर्थांनी श्रवणभक्ती आणि कीर्तनभक्ती ही परस्परांवर आधारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.भक्तीमार्गाचा पहिला आणि सोपा टप्पा आहे तो ऐकण्याचा. श्रवण करण्याचा. जे श्रवण करायचे ते ग्रहण करायचे. त्यातून अध्यात्माचे भ्रमण करायचे आणि मग सतत नामस्मरण करायचे. पहिली पायरी या मार्गावर येण्याची श्रवणाची आहे. त्यासाठी त्या श्रवण करणार्या श्रृतींना, कानांना, श्रवणेंद्रियांना तृप्त करेल असे सुश्राव्य, ज्ञानमय आणि उपासनेला दृढ करेल असे कथन करणारी वाणी उपलब्ध असली पाहिजे. अशी वाणी, जिव्हा, शब्द आणि कथनकर्ता असेल तरच श्रवणाला प्रारंभ करता येईल. असे कान असतील तरच कथनाला अर्थ असेल. त्यामुळे श्रवणभक्ती आणि कीर्तनभक्ती या एकमेकांवर आधारीत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते.कीर्तन करता करता नारद हाच साक्षात नारायण झाला. तुकारामांनीही आपल्या अभंगात म्हटले आहे की देव शोधावया गेला देव होवूनी आलो. अशा प्रकारे कीर्तन भजन या भक्तीतून परमेश्वराशी संधान साधता येते. यातून सर्वश्रेष्ठ ऐकणाराही परमेश्वर प्राप्त करतो. समर्थांनी म्हटले आहे, म्हणौनी कीर्तनाचा अगाध महिमा। कीर्तनें संतोषे परमात्मा। सकळ तीर्थे आणि जगदात्मा। हरिकीर्तने वसे।ज्या ठिकाणी भजन कीर्तन होत असते त्याठिकाणी साक्षात परब्रह्म परमात्मा परमेश्वराचे स्थान निर्माण होते. तिथे असणार्या श्रोत्यांमध्ये साक्षात राम, मारूती अशा शक्ती असतात. त्यामुळे श्रवण आणि कीर्तन भक्तीत एकाककाचवेळी अनुभूती येते. अशा या दोन्ही भक्ती परस्परांवर अवलंबून आहेत. परस्परांना बरोबर घेवून जाणार्या आहेत. परस्परांवर आधारीत आहेत. आजचा श्रोता हा उद्याचा वक्ती असेल. कारण भक्तीमार्गात, ज्ञानमार्गात प्रसार महत्वााचा आहे. आपल्याला जे श्रृत झाले तेच कथन करायचे आहे अशी ही एक साखळी असते. त्यामुळे या दोन्ही भक्ती परस्परांवर आधारीत आहेत.नवविधा भक्तीतील सर्व भक्तींचे प्रकार हे एकेक टप्पे आहेत. सर्वात पहिला टप्पा हा शिकण्याचा, ऐकण्याचा आहे. नंतर जे शिकलो ते सांगण्याचा कथनाचा आहे. त्यामुळेच या नवविधानाम भक्ती दशकातील पहिला समास हा श्रवण भक्तीचे महात्म सांगतो तर दुसरा कीर्तन भक्तीचे महात्म्य सांगतो. परंतु हे दोन्ही प्रक़ार परस्परांवर आधारीत असे मार्ग आहेत हे निश्चित. ॥ जय जय रघुवीर समर्थ॥x
बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
‘श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित आहेत
रविवार, ६ ऑगस्ट, २०१७
गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७
बुधवार, २ ऑगस्ट, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)