शुक्रवार, २६ मे, २०१७

का आले शेकापक्षाला अपयश?

पनवेलमध्ये पहिल्याच महापालिकेत भारतीय जनता पक्षाने यश मिळवून इतिहास रचला आहे. इतिहास यासाठी कारण महापालिकेत पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. पहिल्यांदा सत्ता मिळवल्यावर आता किमान दोन दशके भाजपला पाय रोवून बसण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच ही संधी शेकापक्षाला असताना ती शेकापने गमावली, असेच म्हणावे लागेल.पनवेलमधील विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाची वाढ आहे असे म्हणता येणार नाही. ती भाजपला असलेली सूज आहे असे म्हणावे लागेल. पण शेतकरी कामगार पक्षाची स्वबळाची ताकद असतानाही शेतकरी कामगार पक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांना डावलत मित्र पक्षांना त्या जागा दिल्या. त्यामुळे नाराजांची संख्या शेकापक्षात प्रचंड वाढलेली होती. शेकापक्षाची संभाव्य सत्ता ही भाजपने खेचून घेतली नाही तर नाराजांमुळे गेलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण नसताना आघाडी महाआघाडी करणे हे शेतकरी कामगार पक्षाच्या अपयशाचे म्हणजे सत्तेपासून दूर जाण्याचे कारण ठरले आहे.कोणताही पक्ष जेव्हाआघाडी करतो तेंव्हा अप्रत्यक्षपणे आम्ही कमजोर झालेलो आहोत असे सांगतो. महाराष्ट्रात जेव्हा भाजप नवखा, कमजोर होता तेंव्हा त्यांनी सेनेशी युती केली होती. पण तोच भाजप आता युती तोडून स्वबळाची भाषा करतो. विधानसभेपासून मुंबई, ठाणे, पुणे पनवेल अशा सगळ्या महापालिकेत ही स्वबळाची भाषा करून भाजपने सत्ता मिळवली आहे. मुंबई ठाण्यात आपला आकडा वाढवला आहे. असे असताना शेतकरी कामगार पक्षाने चांगला ग्रामीण भाग आपल्या ताब्यात असताना खारघर, कामोठे अशा मोट्या भागातील सत्ता असताना महाआघाडीचा घोळ का घातला? त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता दुखावला आणि दुरावला. महापालिकेत तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेला कार्यकर्ता शांत बसला. त्याचा फायदा भाजपला झाला. याच ग्रामीण भागातून विधानसभेच्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांना चांगली मते मिळाली होती. बाळाराम पाटील यांना शहरी भागातून मते कमी पडली होती. तो पराभव पनवेल शहरातून झालेला होता. त्या भागातून शेकापचे प्रितम म्हात्रे आणि त्यांच्या प्रभागातील उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे शेकापक्षाकडे स्वबळावर निवडून येण्यासारखी ताकद असताना आघाडी करून आत्मघात करून घेतला असेच म्हणावे लागेल.आघाडी तरी कोणाशी केली? कॉग्रेस आणि राष्ट्रवादीशी केली. काँग्रेसला ना चेहरा आहे ना जनाधार. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जी चूक अखिलेश यादव यांनी केली तीच चूक शेकाप नेत्यांनी केली. निवडणूक जाहीर होईपर्यंत अखिलेश यादव यांना पुन्हा संधी मिळेल,  असे वातावरण होते. परंतु आंतर्गत बंडाळी, नाराजी आणि ऐनवेळी राहुल गांधींबरोबर केलेली आघाडी. याचा फटका अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीला बसला. तोच प्रकार शेकापक्षाच्या बाबतीत झाला. काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे मतदारांनी शेकापक्षाला नाकारले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला जागावाटपात दिलेला वाटा म्हणजे शेकापक्षातील तेवढ्या उमेदवारांची, इच्छुकांची नाराजी. त्या नाराजीचा फरक शेकापला सत्तेपासून दूर घेउन गेला. ताकद असलेला पक्ष आज कमकुवत पक्ष असा चेहरा घेउन बसला आहे. x