शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

युती तोडणे हा भाजपचा यशाचा फॉर्म्युला- पनवेल भाजपची धूर्त खेळी


युती करणार करणार म्हणून ऐनवेळी युती तोडायची आणि स्वबळाची भाषा करायची, हा राज्यातील भारतीय जनता पक्षाचा यशाचा फॉर्म्युला ठरत आहे. त्याच फॉर्म्युलाचा वापर पनवेलचे भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी वापरलेला दिसतो.
    2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून हा फॉर्म्युला भाजप सतत वापरत आहे. त्यात त्यांना यश येताना दिसत आहे. विधानसभा  निवडणुकीत जागा वाटपावरून झालेला वाद आणि तुटलेली युती संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपला फायदेशीर ठरली. भाजपला युतीत जेवढ्या जागा लढवायला मिळाल्या असत्या त्या प्रमाणात विधानसभेत स्वतंत्र लढल्याने भाजपला जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली. भले त्यांनी उमेदवार इतर पक्षांतून आयात केले, वाल्याचे वाल्मिकी केले, पण कमळ फुलले हे नाकारून चालणार नाही. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात आपले चिन्ह पोहोचवण्याचे काम भाजपने केले.
     युती फोडून संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेत पोहोचलेले कमळ त्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीतही स्वतंत्र लढले. त्यापूर्वी युतीची भाषा झाली आणि पुन्हा स्वबळाचा निर्णय झाला. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महत्वाच्या महापालिकांमध्येही भाजपने युती तोडली. त्यामुळे युतीत असताना भाजपचा असणारा आकडा यामुळे अर्थातच वाढला. जास्तीत जास्त महापालिकांमध्ये सत्ता मिळवता आली. नेमकी हीच युक्ती आता पनवेल महापालिका निवडणुकीत रामशेठ ठाकूर  आणि आमदार प्रशांत ठाकूर राबवताना दिसत आहेत.
गेले तीन आठवडे शिवसेनेशी हातमिळवणी केल्याच्या बातम्या पनवेलमध्ये जोरात पसरवल्या गेल्या. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला रोखण्यासाठी युती बळकट करण्याची चर्चाही आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर यांनी केली. प्रत्यक्षात शुक्रवारी ही युती तुटल्याची आणि भाजप पनवेलची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. पूर्णपणे भाजपचा फॉर्म्युला वापरून भाजप या निवडणुकीत उतरणार आहे. या निर्णयाने भाजपला नक्कीच फायदा होईल हे स्पष्ट आहे. याचे कारण...
1. शिवसेना भाजप बरोबर नसल्यामुळे ती विरोधात निवडणूक लढवणार. शिवसेनेचे उमेदवार हे भाजप किंबहुना ठाकूर विरोधातील मते खाणार. ती मते अर्थातच शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीची खाणार. त्यामुळे भाजपला रान मोकळे मिळणार.
2. भाजपमध्ये अन्य पक्षांमधून आलेल्या उमेदवारांना, पक्षातील जुन्या कार्यकत्यार्र्ना सर्वांना यामुळे उमेदवारीची संधी देता येईल. जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या जागा भाजपच्या इच्छुकांना देता येणार असल्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण होईल.
3. शेकापसारखा बलाढ्य पक्ष समोर असताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.  हे कोणतेही पक्ष स्वबळावर लढत नसल्याने मतदार भाजपकडे वळतील असे चित्र दिसते.
4. पहिल्याच महापालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, पक्ष कमकुवत झाला आहे हे बिंबवायला भाजपला सोपे जाणार आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर आणि शेकाप आघाडीत अशा परिस्थितीत आमची ताकद मोठी आहे हे बिंबवण्यात भाजप यशस्वी होणार.
5. शिवसेना जर शेकाप आघाडीत गेली तर जागा वाटपांवरून आघाडीत आणखी वाटेकरी येणार. त्यामुळे पाडापाडीचे राजकारण आघाडीत होणार. त्याचा फायदा भाजप उठवणार.
6. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पनवेलचे मतदार ठाकूर कुटुंबियांसाठी एकवेळ नाही पण भाजपला मतदान करून सत्ता हातात देतील, असे दिसते.
x