शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६
आधी आर्थिक नाड्या आवळा....
पाकीस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकीस्तानवर राग व्यक्त करणार्या पोस्ट सोशला मिडीयावर सातत्याने गेल्या तीन दिवसात पडत आहेत. पण हे शब्दांचे बाण सोडून काही उपयोग नाही हे सरकारला कळणार कधी? आपल्या देशाचे निर्णय आपण घेऊ शकत नाही, ही खरी या देशाची चिंता आहे. कारण पाकीस्तानवर कारवाईसाठी आम्हाला जर अमेरिकेची परवानगी लागत असेल किंवा दुसर्या देशांवर अवलंबून रहावे लागत असेल तर आपण ब्रिटीशांच्या हातून सुटलो आणि वैचारीक पारतंत्र्यांत गेलो आणि अमेरिकेचे मांडलीक झालो असेच म्हणावे लागेल. सोशल मिडीयावरून व्यक्त होणारा राग या कारणामुळे आहे.भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर वृत्तवाहिन्यांवरून प्रचंड चर्चा झाल्या. काथ्याकूट झाला. देशप्रेम ओथंबून वहात असल्याप्रमाणे आणि देशाची काळजी फक्त आपल्यालाच आहे अशा तर्हेने बोलणारे वक्तेही होते. त्याचप्रमाणे भडकावणारेही होते. त्याचवेळी सोशल मिडीयावरून व्यक्त होणारा उद्रेक फार महत्वाचा होता. पाकीस्तानला जात असलेल्या झेलम, सतलज आदी नद्यांचे पाणी बंद करा पासून पाकीस्तानी कलाकारांना हाकलून लावा पर्यंत मते बाहेर येत आहेत. पण हे करायचे कोणी? आमचे सरकार परस्वाधीन आहे. चीन, पाकीस्तान ज्याप्रमाणे स्वतंत्रपणे काम करू शकतात, कोणालाही न जुमानता वागतात त्याप्रमाणे आम्ही वागू शकत नाही. त्यामुळेच एकतर या देशात सैन्यात भरती होण्याचे प्रमाण कमी होईल किंवा आमचे सैन्य मरताना आम्हाला पहावे लागेल. ज्यावेळी सरकार लाचार असते, मजबूर असते, नाईलाज असतो, परस्वाधीन असते, निर्णयक्षम नसते तेव्हा जबाबदारी ही नागरिकांवर येते हे लक्षात घेतले पाहिजे. आज पाकीस्तानचा उपद्रव देशाला आहे. पाकीस्तानला मदत करणारा गुप्त शत्रू म्हणून चीन समोर येत आहे. अनेकवेळा पाकीस्तानला मदत करण्याची भूमिका चीनने बोलूनही दाखवली आहे. अशा परिस्थितीत चीनी अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम जे भारतातून होत आहे ते आपण थांबवले पाहिजे. केवळ शाद्बीक बाण सोडून आणि सोशल मिडीयावर व्यक्त होऊन आपले काम संपणार नाही हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.आपल्या शहीद जवानांना मनापासून श्रद्धांजली देण्यासाठी भारताला हतबल करणार्या देशांच्या आणि महासत्तांच्या आर्थिक नाड्या आवळणे आपल्याला सहज शक्य आहे. अमेरिकेपासून ते चीनपर्यंत सगळ्या पाकसमर्थक देशांना आपण नागरिक धडा शिकवू शकतो.नरेंद्र मोदी मेक इन इंडिया म्हणून परदेशी भारतीयांना आवाहन करत आहेत. आपण भारतीयांनी करून दाखवलं असं म्हणू शकतो. फक्त फार मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे. आज अमेरिका आपल्याला सहकार्य करत नाही. अमेरिकेवर जेव्हा पंधरा वर्षांपूर्वी ९/११ चा हल्ला झाला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केले गेले, त्याचा सूड अमेरिकेने घेतला. पण आपल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर आपण देवू शकत नाही. त्याला अमेरिका अटकाव करते. हा दुजाभाव प्रत्येक भारतीयाच्या मनात सलतो आहे. केवळ एका कसाबला फासावर चढवून २६/११ चा बदला घेतला असे होते काय? एका अफझल गुरूला फासावर चढवून संसदेवरील हल्ल्याचे शल्य कसे काय संपते? त्यामागची ताकद नमवणे महत्वाचे आहे. आम्ही शक्तीप्रदर्शन करण्यास असमर्थ आहोत. आम्ही बलवान आहोत हे सांगू शकत नाही. मग आम्ही दहशवतवाद कसा संपवणार?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)