सगळ्या जगाला उपदेश करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे समजून अत्यंत गलिच्छ भाषेत कीर्तन करणाºया इंदोरीकर महाराज यांचा अखेर घडा भरला. महाराष्ट्रातील सर्वात महागडे कीर्तनकार म्हणवून घेणारे आणि पैशाच्या मागे लागून आपल्या बिनधास्त वक्तव्याने माया जमवणाºयांचे वास्तव रूप आता कायद्यापुढे आलेले आहे. त्यामुळे मुलगा होण्यासाठी सम-विषमचा फॉर्म्युला सांगणाºया या इंदोरीकरांवर कारवाई ही झालीच पाहिजे. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यावर आपल्याकडे बाबा, महाराज भरकटतात हे अगदी आसाराम बापूपासून अनेकांनी दाखवून दिले आहे. त्याच रांगेत इंदोरीकर महाराज जाऊन बसले, पण त्यांचे कीर्तन म्हणजे आतून कीर्तन, वरून तमाशा असेच असते.इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून नेहमीच महिला, मुली यांच्यावर टीका करत असतात. आपण खूप विद्वान आहोत असे भासवत लोकांना हसवण्यासाठी कॉलेजच्या मुली, त्यांचे कपडे, महिला, पती-पत्नी यांच्यातील भांडणे, संबंध असे विषय घेऊन महिलांची बेइज्जती करत असतात. समोर बसलेल्या लहान मुलांनाही आपल्या आई-वडिलांची घृणा वाटेल असे वक्तव्य करत असतात. केवळ हशा मिळवण्यासाठी तमाशातील सोंगाड्याप्रमाणे अत्यंत शिवराळ भाषेत कीर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाचा बाज हा कीर्तनाचा राहात नाही. त्यामुळे कीर्तनाची बदनामी करण्याचे काम हे महाराज करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.या महाराजांच्या कीर्तनाला जमलेला प्रेक्षक कधीही प्रबोधन करून घेण्यासाठी येत नाही तर करमणूक म्हणून येत असतो. त्यामुळे पब्लिक हसतंय म्हटल्यावर तमाशातील वगातील पात्राप्रमाणे वाटेल तसे ते बोलत असतात. लव्ह मॅरेज, मोबाइल, बायको यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाºया इंदोरीकर महाराजांनी आता आपल्या या कीर्तनरूपी तमाशातून सम-विषमचा फॉर्म्युला सांगून केव्हा संग केल्यावर मुलगा होतो आणि केव्हा मुलगी होते हे सांगितले. हे अत्यंत चुकीचे आणि कसलाही अभ्यास न करता त्यांनी वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. अंधश्रद्धा पसरवणे आणि पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी करण्याचे काम हे महाराज करत आहेत. यामागे आयुर्वेदात, पुराणात, धर्मग्रंथांत, शास्त्रार्थ सांगितलेला आहे, पण त्याचा अर्थ या महाराजांनाच समजलेला नाही. त्यामुळे अत्यंत चुकीची माहिती त्यांनी आपल्या कीर्तनातून देऊन समाजव्यवस्था बिघडवण्याचे काम केले आहे. हा बाबा आपल्या कीर्तनातून अत्यंत गलिच्छ भाषेत महिलांची बदनामी करतो. एका कीर्तनात गोरी बायको करू नका. बायको सावळीच करा. गोरी बायको केली, तर उन्हात तांबडी पडते आणि लाइट गेली तर अंधारातही ती दिसते, असले काही तरी घाणेरडे वक्तव्य करतात. काळा-सावळा असा वर्णद्वेश करण्याचे काम इंदोरीकर करत असतात. केवळ करमणुकीसाठी अत्यंत खालच्या भाषेत ते बोलतात, पण यामुळे महाराष्ट्राची कीर्तन परंपरा बदनाम होत आहे.आपल्याकडे नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन असे प्रबोधनाचे आणि भक्तिभाव निर्माण करण्याचे सांस्कृतिक वातावरण आहे. हे वातावरण दूषित करण्याचे काम इंदुरीकर महाराज करताना दिसतात. त्यांनी कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यापूर्वी त्यावर अभ्यास करून बोलण्याची गरज आहे. सर्वांना एकाच माळेत ओवून ते अत्यंत चुकीचे वक्तव्य करत असतात. मुलींचे कपडे यावर तर ते फारच खालच्या पातळीवर येऊन बोलतात, पण बदलत्या काळाप्रमाणे कपड्यात बदल होणे अपरिहार्य आहे, हे या महाराजांना समजू नये का? कॉलेजच्या मुलींनी नऊवारी घालून अन् मुलांनी धोतर नेसून कॉलेजात जायचे का? जगाला अक्कल शिकवायला निघालेल्या या महाराजांच्या घरातील लोक तरी आपल्या मुलांना कॉलेजात सनातन वेषात पाठवतील का? पण कसलेही भान न ठेवता आधुनिक फॅशन, लाइफस्टाइलवर टीका करतात.दारू, तंबाखू यावर बोलणे ठीक आहे. व्यसनांवर टीका करणे ठीक आहे, पण मुलींना मोबाइलच देऊ नका, त्यांचे मोबाइल चेक करा हे सांगताना विश्वासावर चालणाºया कुटुंब व्यवस्थेला तडा देण्याचे काम ते करत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ मोबाइल असणे आवश्यक आहे, पण हे कोणत्या जगात वावरत आहेत?आपल्याकडे कीर्तनातून नेहमीच प्रबोधन केले जाते, पण प्रबोधन करताना भाषा शिवराळ वापरली जात नाही. त्यामध्ये एक प्रकारची सभ्यता असते, पण कीर्तनकाराच्या वेषात येऊन हे बाबा तमाशापेक्षा खालची भाषा वापरतात. समोर असलेल्या आया-बहिणींची अत्यंत खालच्या भाषेत, अपमानास्पद बोलून लायकी काढतात, हे अत्यंत चुकीचे आहे. त्याचा कडेलोट म्हणजे त्यांनी सम-विषम तारखेचा दिलेला सल्ला हा अत्यंत चुकीचा आहे. संग योग्य वेळी केला पाहिजे, इथपत ठीक आहे, पण कोणत्या वेळी केल्याने मुलगा होतो आणि कोणत्या वेळी केल्याने मुलगी होते हे सांगून अंधश्रद्धेला पोषक वातावरण निर्माण केले आहेच. त्याचबरोबर त्यांनी बेटी बचाओ या मोहिमेला छेद देण्याचा प्रकार केला आहे. अशा कीर्तनाने प्रेरित होऊन मुलगी होऊ नये म्हणून कोणी सम तारखेचा आग्रह धरला, तर त्यातून काय साध्य होणार आहे? अशास्त्रीय, चुकीची माहिती देण्याची कीर्तनाची परंपरा नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्याचबरोबर या महाराजांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. ही माफी मागेपर्यंत त्यांच्या कीर्तनावर बंदी घातली पाहिजे. महिलावर्गाने त्यांच्या कीर्तनाला जाऊच नये. कारण समोर बसून अपमान करून घेण्यासाठी महिला का जातात हा न उलगडणारा प्रश्न आहे. कीर्तन हा एक सुसंस्कृत आणि सभ्य प्रकार आहे. या प्रकाराला बदनाम कोणी करत असेल, तर त्यावर बंदी घालावीच लागेल. कीर्तनाच्या नावाखाली तमाशा कोणीच खपवून घेणार नाही. समोर माइक आहे आणि पब्लिक हसतंय म्हणून वाटेल ते बोलून चालत नाही, याचे भान अशा कीर्तनकारांनी ठेवले पाहिजे. आपल्या कीर्तन परंपरेचा मान राखला पाहिजे.
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०
वरून कीर्तन, आतून तमाशा!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा